जपानचे माजी राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यावर एका प्रचारसभेत भाषण करत असताना गोळीबार झाला आणि त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी नारा शहरातील ४१ वर्षीय यामागामी तेत्सुयाला या व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केलीय. शिंजो आबे यांच्या या हत्येमुळे जगभरात खळबळ उडालीय. अशाच घटनांनी याआधीही जग हादरले आहे. तत्कालिन राष्ट्राध्यक्षांनाही अशा मृत्युला सामोरे जावे लागले होते.
कॅरेबियन बेटांवर एक हैती नावाचा देश आहे. अमेरिका खंडातला सर्वांत गरीब देश म्हणून हैतीची ओळख आहे. या हैती देशाचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईस यांची बरोबर एक वर्षांपूर्वी घरात घुसून हत्या करण्यात आलेली. मोईस हे २०१७ पासून हैतीचे नेतृत्व करत होते परंतु त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांना व्यापक निषेधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ७ जुलै २०२१ ला स्पॅनिश लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत त्यांची हत्या केली.
अमेरिकेच्या इतिहासात असे अनेक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत जे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्यापैकी काही जणांची हत्या करण्यात आली होती. अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची १४ एप्रिल १८६५ साली हत्या करण्यात आली होती. हत्या करण्यात आलेले ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांची हत्या अमेरिकेचा त्यावेळचा प्रसिद्ध अभिनेता जॉन बूथ याने केली होती. त्याने लिंकन यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांची हत्या केली होती. त्या घटनेने जग पुरते हादरले होते.
त्यानंतर १८८१ मध्ये अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांना स्टेशनवर चार्ल्स गिटो याने गोळ्या घातल्या होत्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यातून ते पूर्णतः कधीच बरे होऊ शकले नाहीत. त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यांनंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांचे निधन झाले होते.
त्यानंतर अमेरिकेचे २५ वे अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांना सप्टेंबर १९०१ मध्ये न्यूयॉर्कमधील बफेलो येथील एका प्रदर्शनाच्या मैदानावर गोळी मारण्यात आली होती. लिओन याने त्यांच्या पोटात दोन वेळा गोळ्या झाडल्या होत्या. त्यांनतर त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. विल्यम यांनी १८९७ ते १९०१ पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली.
अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या ही इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजकीय हत्यांपैकी एक आहे. मरीन ली हार्वे ओसवाल्ड यांनी डॅलसमध्ये मोटारसायकल चालवताना केनेडींना लक्ष्य केले होते. त्यांच्या अनेक गुणांमुळे आजही ते सर्वांच्या स्मरणात आहेत. वयाच्या ४३ व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले केनेडी हे अमेरिकेचे दुसरे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जातात. जॉन एफ. केनेडी यांची २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेच्या टेक्सास राज्यात हत्या झाली. या हत्येबाबत वेळोवेळी अनेक खुलासे झाले आहेत, मात्र त्यांच्या हत्येमागचे कारण काय, हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही.
भारतातील सुद्धा दोन पंतप्रधानांची हत्या झालीय. भारताच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाली. सुवर्ण मंदिरावरील लष्करी कारवाईची प्रतिक्रिया म्हणून इंदिरा गांधींची हत्या झाली. इंदिरा गांधींना त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकाने गोळ्या घालून ठार केले होते. सात वर्षांनंतर इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी यांचीही पंतप्रधान असताना हत्या झाली. आत्मघातकी हल्ला झाला तेव्हा राजीव तामिळनाडूमध्ये प्रचार करत होते हार घालण्याच्या निमित्ताने एक मुलगी त्यांच्याजवळ आली. त्या हारमध्ये बॉम्ब लपविण्यात आला होता.
यानंतर सुद्धा अनेक नेत्यांवर असे हल्ले झालेत. नुकत्याच झालेल्या जपानच्या माजी पंतप्रधान हत्येची तपासणी सुरु आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते उपचारावेळी त्यांच निधन झालंय. शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. २००६ ते २००७ आणि त्यांनतर २०१२ ते २०२० असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधानपदी होते. त्यांनी २०२० साली प्रकृतीच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. भारताशी संबंध चांगले करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी भारतात शनिवार, ९ जुलै रोजी म्हणजेच उद्या त्यांच्या मृत्यूनंतर एक दिवसीय दुखवटा जाहीर केलाय. आबे यांच्या हत्येमुळे विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांवर झालेल्या अशा हल्ल्यांच्या आठवणी ताज्या झाल्यात.