संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी एकजण हा भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्याकडून मिळालेल्या पासवर लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत पोहोचला होता. याबाबत खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे त्याच्याबाबतची त्यांना असलेली माहिती दिली. घुसखोरी करणारा सागर शर्मा याचे वडील सिम्हा यांच्या मैसुरू या मतदारसंघातील निवासी असून सागर याने नवीन संसद भवनाची इमारत पाहण्यासाठी विनंती केली होती, असे सिम्हा यांनी सांगितले.
नवीन संसद भवनात घुसखोरी करणारा सागर शर्मा हा नवीन संसद भवनात प्रवेश मिळावा, यासाठी सिम्हा यांच्या खासगी सचिवाच्या सतत संपर्कात होता, अशी माहिती सिम्हा यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिली. त्याच्याबाबत आपल्याकडे आणखी कोणतीही माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.
सागर शर्मा हा मनोरंजन देवराज गौडा याच्यासोबत आला होता. त्याने प्रेक्षक गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहामध्ये उडी मारली. त्यांनी घोषणाबाजी करीत पिवळ्या रंगाच्या धुराची नळकांडी फोडली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी संसद भवनाबाहेर एका महिलेसह दोघांनी घोषणाबाजी करत पिवळ्या रंगाच्या धुराची नळकांडी फोडली. या दोघांची नावे अमोल शिंदे व नीलम आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असली तरी हा संपूर्ण कट सहा जणांनी रचल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत
संसदेतील घुसखोरांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक
लोकल ट्रेनमध्ये तरुणीसोबत ठुमकने होमगार्डला पडले महागात!
काँग्रेसची टीका
सागर शर्मा हा सिम्हा यांच्या पासवर संसद भवनात गेल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या मैसुरू येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी आणि प्रताप सिम्हा यांचे एकत्रित छायाचित्र ‘एक्स’वर पोस्ट करून ‘प्रताप सिम्हा यांच्या पासवरून संसदेत घुसखोरी’ असे त्यांनी लिहिले होते.