पंजाबमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला करण्यात आलेल्या अडवणूक प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी असलेल्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांना धमकी देण्यात आली आहे. इंदू मल्होत्रा यांना धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे.
हा फोन कुणी केला किंवा कोणत्या गटाकडून आला याची माहिती समोर आलेली नाही पण या धमकीच्या फोनच्या माध्यमातून काही कटकारस्थान शिजत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परदेशातील खलिस्तानी चळवळी या धमक्यांमागे असल्याचीही चर्चा आहे. सिख्स फॉर जस्टिस असे या संघटनेचे नाव सांगितले जात आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्याला झालेल्या अडवणूक प्रकरणी मल्होत्रा यांच्या देखरेखीखाली हा तपास होणार आहे. याआधी, सुरक्षेतील दिरंगाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात काही वकिलांनी याचिका दाखल केली होती, त्यांनाही असेच धमकीचे फोन आले आहेत.
धमक्यांचे ऑडियो या संघटनेच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत. धमक्या देणारी व्यक्ती या ऑडिओमध्ये म्हणते आहे की, तुम्हाला पंतप्रधान आणि शीख यांच्यापैकी एकाला निवडावे लागेल. याआधी, यासंदर्भात न्यायालयात धाव घेणाऱ्या वकिलांनाही या प्रकरणापासून लांब राहण्याची धमकी देण्यात आली होती.
हे ही वाचा:
गुरु रविदास जयंतीमुळे पंजाब निवडणुकीच्या तारखा बदलल्या
अबुधाबीत ड्रोन हल्ल्यातील स्फोटात २ भारतीय ठार
‘मेस्टा’ने केल्या राज्यातील काही शाळा सुरू
‘मोदींना मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो’
१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरोजपूर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी येणार होते. पण निर्धारित स्थळी जाण्याआधी एका पुलावर त्यांच्या ताफ्याला शेतकरी आंदोलकांनी रोखले. त्यावरून देशभरात पंजाबमधील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका झाली होती. मोदी हे फिरोजपूरला आधी हवाई मार्गे जाणार होते मात्र खराब हवामानामुळे त्यांना रस्तामार्गे जावे लागले. तिथेच त्यांच्या ताफ्याला अडथळा आणण्यात आला.