समरकंद, उझबेकिस्तान येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी रशिया युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावे अशी अपेक्षा व्यक्त केलीच पण आता युद्धाची वेळ नाही, असा सल्लाही मोदी यांनी पुतिन यांना दिला. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या परिषदेच्या निमित्ताने मोदी आणि पुतीन एकमेकांशी संवाद साधत होते.
पुतिन यांनी मोदी यांना सांगितले की, फेब्रुवारीत सुरू झालेले हे युद्ध आणि हा संघर्ष थांबविण्याचा आमचाही विचार आहे. भारताला याबद्दल नक्कीच चिंता आहे आणि लवकरात लवकर हे आम्हाला शक्य होईल अशी आशा आहे.
रशिया युक्रेनच्या या युद्धात रशियालाही मोठा फटका बसला असून या युद्धामुळे जागतिक स्तरावरील व्यापारावरही विपरित परिणाम झालेले आहेत. पुतिन म्हणाले की, दुर्दैवाने समोरचे राष्ट्र अर्थात युक्रेनचे नेतृत्व चर्चेच्या मार्गाने तोडगा काढण्यास तयार नाही. त्यांनी लष्करी कारवाईच्या माध्यमातूनच याचे उत्तर शोधायचे आहे.
हे ही वाचा:
इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या किंमती होणार कमी
रुह अफजाच्या बाटलीत होते पाकिस्तानचे भूत
भारत-पाकिस्तान वर्ल्डकप मॅचसाठी ५ लाख तिकिटांची विक्री
सध्या तरी भारताने रशियावर युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल टीका केलेली नाही. शेवटी रशिया हा भारताला सर्वाधिक प्रमाणात शस्त्रपुरवठा करणारा देश आहे. या एससीओ परिषदेत कझाकस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांचाही समावेश आहे. २००१मध्ये या परिषदेची स्थापना झाली. राजकीय, आर्थिक व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही परिषद स्थापन करण्यात आली होती.
य़ावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन आणि रशिया यांचे आभारही मानले. संकटाच्या काळात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सहीसलामत देशाबाहेर येण्यासाठी या दोन्ही देशांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मोदी यांनी हे आभार मानले.