रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच उधमपूर- श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करतानाच हा प्रकल्प जम्मू- काश्मिरच्या सामान्य जनतेसाठी अपेक्षापूर्ती करणारा ठरेल असे म्हटले आहे. या वेळेसच पियुष गोयल यांनी हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले आहेत. त्यासाठी, आवश्यक ती सर्व सामुग्री वेळेवर खरेदी करण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.
उत्तर रेल्वेचे अधिकारी आशुतोष गांगल यांनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले की रंबान आणि रिआसी भागात या प्रकल्पाचे काम जोमाने चालू आहे. हा भाग कोविड प्रभावित म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे कोविड मार्गदर्शक सुचनांचे पालन करून या प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या ३६६ कामगारांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र आता सर्वच्या सर्व कामगारांची तब्येत पूर्ववत झाली आहे.
या मार्गावर ब्रॉड गेज रेल्वे धावणार असल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. बारामुल्ला- बनिहाल आणि जम्मू- उधमपूर- कटरा या भागातील बांधकाम पूर्ण झाले आहे. कटरा ते बनिहाल भागातील १११ किमी लांबीच्या मार्गावर बांधकाम सध्या चालू आहे. विविध भौगोलिक रचनांमुळे हा भाग बांधकामासाठी अधिक आव्हानात्मक आहे. अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य पोहोचवण्यासाठी आधी रस्ता बांधावा लागत आहे.
निसर्गावर मात करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी के.आर.सी.एल, आय.आर.सी.ओ.एन, आणि उत्तर रेल्वे एकत्रित प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत भारतातील इतर उच्च दर्जाच्या संस्थादेखील कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे आकर्षण असलेला चिनाब नदीवरील पूल ९५ टक्के पूर्ण झाला असून अंजी पूल देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.