भारतविरोधी कागाळ्या करणाऱ्या चीनने आता भारतीय माध्यमांनादेखील धमकवायला सुरूवात केली आहे. चीनने भारतीय माध्यमांना तिबेट कार्ड वापरल्यास द्वीपक्षीय संबंधांवर परिणाम होईल असे सांगितले आहे.
अमेरिकेच्या ‘तिबेटन पॉलिसी ऍण्ड सपोर्ट ऍक्ट’ बद्दल बोलताना भारतातील चीनी वकिलातीने प्रसिध्द केलेल्या पत्रकात हा भारत आणि चीनचा अंतर्गत मामला असल्याचे म्हटले आहे. या पत्रकानुसार दोन शेजारील उभरत्या आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांमधील अंतर्गत संबंध सुधारणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर हा मामला दोन्ही देशांमधला आहे.
यासंदर्भात बोलताना चीनी प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही आशा करतो की भारतीय माध्यमे चीनी सार्वभौमत्वाशी निगडीत असणाऱ्या बाबतींत योग्य भूमिका घेतील. या माध्यमांनी तिबेट (क्शीझांग) हा चीनचा सार्वभौम भाग असून, त्याच्या सध्याच्या आर्थिक प्रगतीकडेदेखील पहावे. माध्यमांनी चीन-भारत संबंध बिघडवण्यासाठी तिबेट कार्डचा वापर करण्याऐवजी हे संबंध सुधारण्यासाठी मदत करावी. चीनच्या अंतर्गत मामल्यांत तिबेट कार्डचा गैरवापर करून ढवळाढवळ करू नये.
चीनी दुतावासाच्या सांगण्यानुसार अमेरिकेचा कायदा चीनच्या अंतर्गत बाबतींत खूप ढवळाढवळ करणारा आहे. याशिवाय हा कायदा आंतर्राष्ट्रीय संबंधांच्या पायाभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.