शनिवारी, २ एप्रिल रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाने आर्थिक संबंधांना चालना देण्यासाठी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल व ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री डॅन तेहान यांनी ऑनलाइन समारंभात भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समकक्ष स्कॉट मॉरिसनही उपस्थित होते.
या करारानुसार, ऑस्ट्रेलिया भारताच्या बाजारपेठेतील कापड, चामडे, दागिने आणि क्रीडा उत्पादनांसह ९५ टक्क्यांहून अधिक भारतीय वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश प्रदान करेल. या करारामुळे पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार USD २७ अब्ज वरून ४५ ते ५० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
हा करार ऐतिहासिक असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी फार कमी वेळात हा करार केला आहे, जो दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाचा पुरावा आहे. जागतिक पुरवठा साखळी विश्वासार्ह बनवण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या स्थिरतेसाठी हा करार उपयुक्त ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, भारत-ऑस्ट्रेलियाच्या संबंधांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि एका दशकात विकसित अर्थव्यवस्थेसोबत भारताचा हा पहिला करार आहे. आम्ही येत्या ४ ते ५ वर्षांत भारतात दहा लाख नोकऱ्या निर्माण करण्याची अपेक्षा करत आहोत. आगामी काळात भारतीय शेफ आणि योग शिक्षकांसाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याबाबत देखील या करारादरम्यान चर्चा झाली आहे.
हे ही वाचा:
श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू
आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी
राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष….
” या कराराने दोन्ही देशांमधील सतत वाढत जाणाऱ्या संबंधांना आणखी एक ऐतिहासिक आयाम जोडला आहे. कोळसा, एलएनजी, दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याद्वारे ऑस्ट्रेलिया भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी सहकार्य वाढवू शकेल. आर्थिक आणि व्यापार सहकार्यातील स्थिरता हा क्वाड गटाच्या नेत्यांमधील चर्चेचा मुख्य विषय आहे. या करारामुळे शिक्षण, व्यवसाय, पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये विस्तार होईल आणि हा करार मोठ्या प्रमाणात संधी देणारा आहे, ” असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन म्हणाले.