भारत आणि चीन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चढाओढीचे लवकरच संघर्षात रूपांतर होणार का, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या काही छायाचित्रांमुळे भारत आणि चीनच्या लष्करी तुकड्या आणि रणगाडे आता कैलास पर्वतरांगांमध्ये एकमेकांपासून काहीशे फूट अंतरावर आहेत. त्यामुळे या दोन देशांत लष्करी संघर्ष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात भारताने ताब्यात घेतलेल्या रेझांग ला येथे अवघ्या ५०० फुटांवर या दोन्ही देशांच्या लष्करी तुकड्या उभ्या आहेत.
या वर्षाच्या प्रारंभी उत्तरेकडील आघाडीचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी म्हटले होते की, भारत आणि चीन यांचे सशस्त्र लष्कर पूर्व लडाखमध्ये संघर्षाच्या तयारीत आहे. भारताने कैलास पर्वतरांगांवर नियंत्रण मिळविल्यानंतर जोशी यांनी हे भाष्य केले होते.
हे ही वाचा:
मुंबईतील ताज हॉटेलवर हल्ल्याच्या धमकीचा कॉल
इक्बाल कासकरची १५ तास कसून चौकशी
गरीब घरातील ३३ मुलींच्या धर्मांतराची तयारी केली होती!
शेती कायद्याविरोधातील आंदोलकांचा धुडगूस
ते फेब्रुवारीतील एका मुलाखतीत म्हणाले होते की, आम्ही संघर्षाच्या उंबरठ्यावर आहोत. ३१ ऑगस्टला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कैलास पर्वतारांगांजवळ येण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती खूपच तणावग्रस्त झाली होती. संघर्ष पेटण्याची चिन्हे होती.
जानेवारी २०२१पासून उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून हे स्पष्ट होते आहे की, भारत आणि चीनच्या लष्करांत ३७० फुटांचे अंतर आहे. दोन्ही लष्करांचे रणगाडे एकमेकांकडे तोंड करून तैनात आहेत. इतर लष्करी वाहने, तंबू, बांधकामे हीदेखील या छायाचित्रांत स्पष्ट दिसतात.
फेब्रुवारी महिन्यात दोन्हीकडील लष्करी तुकड्यांनी कैलास पर्वतरांगा आणि पॅनाँग सरोवराच्या उत्तरेकडील भागातून माघार घेण्यास सुरुवात केली. पण पूर्व लडाखमध्ये मात्र दोन्ही देशांची लष्करे आमनेसामने आहेत.