विरोधी पक्षांच्या बेंगळुरू येथील बैठकीत इंडिया हे नवे नाव धारण करण्यात आले. त्यावरून देशभरात बरीच चर्चा रंगलेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत या शब्दावरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, केवळ इंडिया हा शब्द वापरून काहीही होत नाही. कारण इस्ट इंडिया कंपनीनेही आपल्या नावात इंडिया शब्दाचा वापर केला होता तर इंडियन मुजाहिदिननेही इंडिया हा शब्द आपल्या नावात वापरला.
इंडिया या नावाने जे नवे संघटन उभे करण्यात आले आहे त्यात २६ पक्ष आहेत. त्यांची मध्यंतरी बैठक झाली होती. तर त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए पक्षांची बैठकही झाली. त्यात ३८ पक्षांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला. सध्या मणिपूरमधील वातावरणाचे पडसाद संसदेत उमटत असून पंतप्रधानांनी यावर बोलले पाहिजे असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर राजनाथ सिंह यांनी या विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली पण पंतप्रधानांनी यावर आधी बोलले पाहिजे असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यावरून सध्या विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत.
हे ही वाचा:
न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी
कामावर जाण्याच्या घाईपोटी नर्सला गमवावे लागला हात-पाय
या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी या बैठकीत म्हणाले की, याआधी कधीही आपण असा दिशाहीन विरोधी पक्ष पाहिला नव्हता. हा विरोधी गट विस्कळीत आणि निराश झालेला आहे. पंतप्रधान असेही म्हणाले की, विरोधकांचे वागणे असे आहे की, त्यांना दीर्घकाळ आता सत्तेत येण्याची इच्छाच राहिलेली नाही.
यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आम्हाला मणिपूरवर चर्चा हवी आहे पण पंतप्रधान इस्ट इंडिया कंपनीबद्दल बोलत आहेत.
भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनीही यासंदर्भात भाष्य केले आणि इंडिया शब्दावरून विरोधकांवर शरसंधान केले. ते म्हणाले की, सध्या काही लोक इंडियन मुजाहिदीन आणि इंडियन पीपल्स फ्रंट अशा नावांचा उपयोग करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इस्ट इंडिया कंपनी यांची स्थापना परदेशी व्यक्तींनी केली. आता लोक इंडियन मुजाहिदीन आणि इंडियन पीपल्स फ्रंट अशा नावांचा वापर करत आहेत. ते असेही म्हणाले की, आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिमान वाटतो. आम्ही २०२४ला सत्तेत येणार हे नक्की. दरम्यान, लोकसभेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार इंडिया या संघटनेतील पक्ष करत असल्याचे कळते.