पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एका समिटदरम्यान देशाच्या विकास आणि भविष्यातील दिशेवर आपले विचार मांडले. या समिटमध्ये त्यांनी भारताच्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि त्याच्या जागतिक भूमिकेबद्दल सविस्तर चर्चा केली.
त्यांनी सांगितले की, आज संपूर्ण जग भारताकडे लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भारत अल्पावधीतच जागतिक अर्थव्यवस्थेत आपले स्थान कसे वाढवू शकला. त्यांनी भारताच्या आर्थिक यशावर प्रकाश टाकत सांगितले की, गेल्या दशकात भारताने आपली जीडीपी दुप्पट केली, ज्यामुळे २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आणि नव्या मध्यमवर्गाचा भाग बनले.
२०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ही समिट म्हणजे भारताच्या भविष्याचा आराखडा तयार करण्याची संधी आहे. आपल्याला सर्वांनी मिळून विकसित भारताच्या दिशेने पुढे जायचे आहे.” त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, २०४७ पर्यंत भारत नक्कीच विकसित राष्ट्र बनेल. युवा पिढीला उद्देशून त्यांनी सांगितले की, “भारताची खरी शक्ती त्याची तरुणाई आहे. आजचे युवकच २०४७ पर्यंत भारताच्या विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील.”
भारत आता केवळ जागतिक मंचावर भागीदार नसून, भविष्यातील घडामोडींना आकार देण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे. कोरोना काळात भारताने केवळ स्वतःची लसीकरण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली नाही, तर १५० हून अधिक देशांना मदतीचा हात दिला. यामुळे भारताची भूमिका जागतिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनात अधिक महत्त्वाची बनली आहे, असेही मोदी म्हणाले.
परराष्ट्र धोरण आणि जागतिक सहभाग
परराष्ट्र धोरणावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची नवी नीति ‘इंडिया फर्स्ट’ आहे. भारत आता प्रत्येक देशाशी समानता आणि सन्मानाच्या तत्त्वावर संबंध प्रस्थापित करत आहे. त्यांनी जागतिक आपत्ती व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या सीडीआरआय योजनेचा उल्लेख केला, जी नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास मदत करेल.
भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे लहान देशांना टिकाऊ ऊर्जा पुरविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या उपक्रमात १०० हून अधिक देश सहभागी झाले आहेत, हे दर्शवते की भारत जागतिक ऊर्जा गरजा भागवण्यात अग्रणी भूमिका बजावत आहे.
हे ही वाचा:
न्यायव्यवस्थेचे ब्रीद बदलल्याचा खोटा प्रचार करणाऱ्या निरंजन टकलेवर गुन्हा दाखल!
सतीश सालियन यांना बकरा बनवण्याची तयारी होती…
सलमान खानच्या घडाळ्यात राम मंदिर…मौलाना शहाबुद्दीन रजवी संतापले
‘पूरनसोबत फलंदाजी करणे रोमांचक’ : मार्श
आर्थिक सुधारणा आणि भ्रष्टाचार निर्मूलन
पूर्वी सरकारी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असे. मात्र, आता गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे, ज्यावरून सरकारच्या सर्व खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावी बनल्या आहेत. यामुळे सरकारने १ लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीमुळे ३ लाख कोटी रुपये अपहाराच्या फेऱ्यात जाण्यापासून वाचले आहेत. यामुळे १० कोटी बनावट लाभार्थ्यांना योजनांमधून बाहेर काढण्यात आले आहे. करदात्यांचा सन्मान राखून सरकारने कर प्रणाली अधिक सोपी केली आहे, ज्यामुळे आयकर विवरणपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगवान आणि सुलभ झाली आहे.
मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत
पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत आणि उज्ज्वला योजना यांसारख्या योजनांच्या यशाचा उल्लेख करताना सांगितले की, आज प्रत्येक भारतीय उत्तम आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा मिळवत आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्रातही मोठे परिवर्तन घडून आले आहे.
“मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” अंतर्गत, भारत हा जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. भारतीय उत्पादने आता देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहेत. ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये भारताची मोठी प्रगती झाली असून, मोटरसायकल आणि कारचे सुटे भाग जर्मनी आणि युएईसारख्या देशांमध्ये पाठवले जात आहेत.
भारताच्या सौर ऊर्जा उद्योगात २३ पट वाढ झाली आहे आणि संरक्षण क्षेत्रातील निर्यात २१ पट वाढली आहे. याशिवाय, देशात पहिल्यांदाच “मेड इन इंडिया” एमआरआय मशीन तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे MRI चाचण्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.