“मार्च २०२१ पर्यंत भारतात १७ राफेल विमाने दाखल होतील.” अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. तर २०२२ पर्यंत राफेल विमानांचा संपूर्ण ताफा भारतात येणार आहे. असेही ते पुढे म्हणाले.
२०१६ मध्ये भारताने फ्रेंच सरकार आणि डसो या राफेल बनवणाऱ्या कंपनीशी करार केला होता. या करार अंतर्गत भारताला ३६ राफेल विमाने ₹५९,००० कोटी मध्ये मिळणार आहेत.
राज्यसभेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देत असताना सिंग म्हणाले की, “मी या सदनामध्ये सांगू इच्छितो की मार्च अखेरपर्यंत १७ राफेल विमाने भारतात येणार आहेत आणि २०२२ पर्यंत विमानांचा एक ताफा पूर्णपणे भारतात आलेला असेल.”
१० सप्टेंबर २०२० रोजी पहिली ५ राफेल विमाने भारतीय हवाई दलामध्ये सामील केली गेली होती. यावेळी राजनाथ सिंग यांनी राफेल विमानाची शस्त्रपूजा केल्यामुळे भारतात विरोधकांनी आणि काही ‘पुरोगाम्यांनी’ त्यांच्यावर टीका देखील केली होती.
सिंग यांनी राज्यसभेत पुढे अससेही सांगितले की, “ही सर्व विमाने पूर्वीप्रमाणे दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने हवाई दलामध्ये सामील करून घेतली जातील.”
या विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘चौकीदार चोर है’ अशी नारेबाजी केली होती. परंतु त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मै भी चौकीदार’ ही घोषणा भारी पडली.