भाजपाला केंद्रात भक्कम पर्याय म्हणून विरोधकांनी ‘इंडिया’ नावाची आघाडी उघडली आहे. या आघाडीत २६ राजकीय पक्ष असून या आघाडीच्या लोगोचे अनावरण तिसऱ्या म्हणजेच मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात येणार होते. मात्र, मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसांची बैठक झाली असून यावेळी लोगोचे अनावरण करण्यात आलेले नाही. लोगोवरून या सर्व पक्षांमध्ये एकमत नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी देशभरातून नेते मुंबईत दाखल झाले होते. यावेळी इंडिया आघाडीचा लोगो जनतेसमोर येणार होता. मात्र, लोगो अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. काही पक्ष नव्याने आले असून त्यांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. शिवाय समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण तिसऱ्या बैठकीतही झालेले नाही.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर बोलताना म्हटले की, “इंडिया आघाडीच्या लोगोबाबत आमचा विचार सुरू आहे. सर्व नेत्यांनी लोगोबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लोगोबाबत अद्याप काम बाकी असल्याने आजचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे.”
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, डीएमकेचे एम के स्टेलिन, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी, आपचे राघव चढ्ढा, आरजेडीचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, जावेद अली खान, ललन सिंह, डी राजा आणि ओमर अब्दुला, पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचा या समन्वय समितीत समावेश असणार आहे.
इंडिया आघाडीच्या निमंत्रकाचं नाव निश्चित होईल अशी देखील चर्चा होती. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची या पदासाठी चर्चा होती. मात्र, त्यावरून काही वाद होऊ नयेत म्हणून निमंत्रक पदाचा निर्णय टाळण्यात आल्याच्या चर्चा आहेत.
हे ही वाचा:
जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित
विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल
मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी
माध्यमांनी सामाजिक जाणिवा वाढवायला हव्यात!
पंतप्रधान पदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावरही अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. काँग्रेसकडून राहुल गांधी, तृणमूलमधून ममता बॅनर्जी, आपमधून अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आदी नेत्यांनी पंतप्रधान पदासाठी दावा सांगितला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्येचं अंतर्गत स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र आहे.