भारत-चीन दोन्ही देशांनी पँगाँग या तलावाच्या दक्षिणेकडून माघार घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक महिने प्रलंबित असलेला प्रश्नावर आश्वासक तोडगा निघाला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
सुत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार फौज अजूनही मोक्याच्या स्थानावर आपली जागा टिकवून आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरूवात केल्याचे चीनी संरक्षण मंत्रालयाने घोषित केल्यानंतर त्यांनी सांगितले. याबरोबरच पूर्व लडाख मधल्या अनेक विवादीत स्थानांवरून चीनी सैन्याने माघार घ्यायला सुरूवात केली आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी दोन्ही सैन्याच्या सैन्याधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकी नंतर या हालचालींना सुरूवात झाली आहे.
चीनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू किआन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार भारतीय आणि चीनी सैन्याने चर्चेच्या ९व्या फेरीत मान्य केलेल्या सीमेपर्यंत माघार घ्यायला दिनांक १० फेब्रुवारी रोजी सुरूवात केली आहे.
सैन्याने एकाच वेळेस आणि पद्धतशीरपणे माघार घेण्यास सुरूवात केली असल्याचे देखील वू यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. चीनी संरक्षण मंत्रालयाने माघारीबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. त्याबरोबरच रणगाडे आणि गाड्यांच्या माघारीबाबत भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे कोणतेही पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.