गेल्या २६ वर्षांत प्रथमच भारताचे पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे इजिप्तला भारतामधून व्यापार वाढण्याची तसेच, त्याला ब्रिक्समध्ये स्थान मिळेल, अशी आशा आहे. तर, दुसरीकडे भारताला आफ्रिका, अरब देश आणि युरोपातील बाजारांमध्ये व्यापार वाढवण्याची संधीही आहे. त्यामुळे भारत आणि इजिप्त या दोन्ही देशांसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. या दौऱ्यादरम्यान इजिप्तशी मुक्त व्यापार करण्याची मागणी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, इजिप्तमध्ये कृषीउत्पादने आणि हलक्या वाहनांच्या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. ‘भारत आणि इजिप्तदरम्यान ऐतिहासिक व्यापारी संबंध असून ते मजबूत आणि समतोल आहेत.
इजिप्त हे आफ्रिका आणि युरोपचे प्रवेशद्वार आहे. कृषी, जैव प्रोद्योगिकी, औषधी, नूतन ऊर्जेमध्ये सहकारासह भारताने इजिप्तशी ‘लॉजिस्टिक’ क्षेत्रातही भागिदारी करण्याबाबत विचार केला पाहिजे,’ असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फियो)चे संचालक अजय साहाय यांनी सांगितले. आगामी तीन वर्षांत इजिप्तबरोबरचा भारताचा व्यापार सहा अब्ज डॉलरवरून १५ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख
जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद
नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत
कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई
काही ठळक मुद्दे
- कैरोमार्गे अरब आणि उत्तर आफ्रिकी देशांत बाजारपेठ वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
- इजिप्तचा समावेश ब्रिक्स संघटनेत झाल्यास भारतही चीनसमोर संतुलन राखू शकेल. चीनला ‘ब्रिक्स’ संघटनेत पाकिस्तानला सामावून घ्यायचे आहे.
- अरब आणि आफ्रिकी देशांमध्ये इजिप्तची लोकसंख्या सर्वाधिक आहे. येथील सुएझ कालव्यातून जगभरातील १२ टक्के व्यापार होतो.
- चीनचा इजिप्तमध्येही प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे संतुलन राखण्यासाठी भारताला इजिप्तशी संबंध चांगले ठेवावेच लागतील.
- इजिप्तमध्ये सध्या ५० भारतीय कंपन्या आहेत.
- सन २०२१-२२मध्ये भारताची इजिप्तमध्ये ३.७४ अब्ज डॉलर निर्यात होती. ही निर्यात सन २०२२-२३मध्ये वाढून ४.१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. मात्र इजिप्तकडून भारतात होणारी आयात २ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. सन २०२१-२२मध्ये ही आयात ३.५ अब्ज डॉलर होती.
या वस्तूंची होते आयात-निर्यात
भारत इजिप्तमधून कच्चे तेल, रसायने, कच्चा कापूस आयात करते. तर, गहू, तांदूळ, सुती धागे, पेट्रोलिअम पदार्थ, मांस आणि हलक्या वाहनांची निर्यात भारतातून इजिप्तला केली जाते.