पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगितले की, भारताने अंतिम मुदतीच्या पाच महिने आधीच पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठले आहे. पंतप्रधान मोदींनी विज्ञान भवन येथे ‘माती वाचवा आंदोलन’ वर आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. जगातील मोठमोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक संसाधनांचे शोषण तर करत आहेतच पण कार्बन उत्सर्जनाचा सर्वाधिक हिस्सा हा त्यांच्याच नावावर आहे.
गेल्या आठ वर्षांत सर्व सरकारी योजना या एकप्रकारे पर्यावरण रक्षणाशी संबंधित आहेत. माती रसायनमुक्त कशी करावी, जमिनीत असलेले जीवजंतू कसे वाचवायचे, जमिनीतील ओलावा कसा टिकवायचा, कमी भूजलामुळे जमिनीचे होणारे नुकसान कसे दूर करावे, वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जमिनीची सतत होणारी धूप कशी थांबवायची,अशा पाच प्रमुख गोष्टींवर सरकार भर देत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.
पूर्वी आपल्या देशातील शेतकऱ्याला आपल्या शेतातली माती कोणत्या प्रकारची आहे, त्यात कशाची कमतरता आहे, याची माहिती नव्हती. या समस्येवर मात करण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य पत्रिका’ देण्याची मोठी मोहीम राबविण्यात आल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘कॅच द रेन’ सारख्या मोहिमेद्वारे आम्ही देशातील जनतेला जलसंधारणाशी जोडत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
या वर्षी मार्चमध्ये देशातल्या मोठ्या १३ नद्यांच्या संवर्धनाची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासोबतच नद्यांच्या काठावर जंगल निर्माण करण्याचे कार्यही करण्यात येत आहे. जैवविविधता आणि वन्यजीवांशी संबंधित धोरणांच पालन केल्यामुळे वन्यजीवांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, तिघांचा मृत्यू
बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू
“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”
“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने गंगेच्या काठावर वसलेल्या गावांमध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा आणि नैसर्गिक शेतीचा एक मोठा कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपली शेतं जमीन केवळ रसायनमुक्त होणार नाहीत, तर नमामि गंगे मोहिमेलाही नवं बळ मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताने आपल्या स्थापित उर्जा निर्मिती क्षमतेपैकी ४० टक्के वीजनिर्मिती क्षमता बिगर जीवाश्म-इंधनावर आधारित स्त्रोतांकडून साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य निर्धारित वेळेच्या ९ वर्षे आधीच गाठले आहे.