भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या इंडी आघाडीची आताच झालेल्या पाच विधानसभांच्या निकालानंतर होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. याआधी ६ डिसेंबरला ही बैठक दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता हीच बैठक डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार आहे.या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित न राहण्याचे ठरविले.
काँग्रेसने इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया)ची पुढील बैठक ६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत बोलावली होती. मात्र या बैठकीविषयी काहीच माहिती नसल्याने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले. त्यामुळे आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याच कालावधीत उत्तर बंगालमध्ये काही कार्यक्रम असल्याने बॅनर्जी तेथे हजेरी लावणार आहेत.
‘मला इंडिया आघाडीबद्दल काहीच माहिती नाही. कोणीच मला याबाबत सांगितले नाही किंवा कोणीही मला त्यासाठी फोनही केला नाही. काहीच माहिती नाही. मला ६ आणि ७ डिसेंबर रोजी उत्तर बंगालमध्ये काही कार्यक्रमांना हजेरी लावायची आहे. मी आधीच वेगळे नियोजन केले आहे. त्यामुळे आता जरी त्यांनी मला फोन केला, तर मला माझे नियोजन बदलावे लागेल. त्यांनी मला सांगितले असते, तर मी बैठकीला गेले असते,’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे त्या नवी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या गैरहजर राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांना गोळ्या घातल्या
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
जेडीयूच्या खासदाराने पंतप्रधान मोदींचे केले कौतुक म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’!
याआधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ६ डिसेंबरच्या बैठकीला अन्य घटकपक्षांसह तृणमूल काँग्रेसलाही बोलावले असल्याचे सांगितले होते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपने पुन्हा मोठ्या फरकाने सत्ता काबीज केल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.