मुंबईसह राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या खूप कमी आहे. ही टेस्टिंग वेगाने वाढवावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून टेस्टिंगची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आजही त्याचा पुनरुच्चार केला.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात रोज 65 हजाराच्यावर रुग्ण आढळत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोना चाचण्या कमी प्रमाणात होत आहेत. मुंबईसह राज्यात कोरोनाची टेस्टिंग वाढली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून मी टेस्टिंग वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच मुंबईतील मृतांच्या आकड्यांचा ताळमेळ लागत नाही. त्याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे, असं ते म्हणाले.
राज्यात लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. त्यावर तुमची काय भूमिका आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. यावेळी त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. लॉकडाऊनवर आताच काही बोलणार नाही. सरकार काय निर्णय घेतं, त्यानंतर प्रतिक्रिया देता येईल. मात्र, लॉकडाऊनबाबत आम्ही जनतेच्या सोबत आहोत, असं सांगत लॉकडाऊनला विरोध करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, वर्ध्यात आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिनचा पुरवठा आणि मनुष्यबळ वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाशी चर्चा करून आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली.
हे ही वाचा:
थ्री डी प्रिंटिंगमधून उभी राहणार बिल्डिंग
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी सीबीआयकडे केले अनेक गौप्यस्फोट?
ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन
आता ठाकरे सरकारने मरण्याची वेळही निश्चित करावी
फडणवीस यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून राज्यातील कोरोना परिस्थितीकडे त्यांचं लक्ष वेधलं होतं. आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, संसर्गदर १५ टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असे आभासी चित्र तयार करणे योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे. या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. परंतु महत्त्वाचे हे की, हा शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल, हे अधिक महत्त्वाचे आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.