देशात कोरोना रुग्णांच्या संख्येचा दिवसागणिक विस्फोट होत असताना या संकटाचे सावट आता अर्थसंकल्पीय अधिवेशनावर पसरले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना, संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता वेळेत पूर्ण करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. गेल्या एका महिन्यात संसद भवनातील ७०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
संसद भवनातील ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद ९ जानेवारीपर्यंत करण्यात आली होती. मात्र, बुधवारी १३ जानेवारी रोजी हा आकडा ७०० च्या पुढे गेला असून आता एकूण ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या आकडेवारीत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली असून ५० टक्के अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बाधितांपैकी सुमारे २०० कर्मचारी हे राज्यसभेतील आहेत तर उर्वरित लोकसभेसह अन्य विभागांशी संबंधित आहेत.
हे ही वाचा:
लडाख प्रशासनाने उर्दूबद्दल घेतला हा मोठा निर्णय
मेहता पब्लिकेशन हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन
फाळणीमुळे विभक्त झालेले भाऊ भेटले ७४ वर्षांनी
निळू फुले यांच्यावरील बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका कोण करणार?
आगामी अधिवेशनासाठी उपाययोजना आणि पर्यायांचा विचार करत असून अंतिम पर्याय हा या महिन्याच्या अखेरीस कोरोना परिस्थितीवर अवलंबून असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जातो. त्यासाठी संसदेचे अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू व्हायला हवे.