२ मे रोजी देशभर झालेल्या पाच विधानसभा निवडणूकांचे निकाल लागणार आहेत. पण या पाचही राज्यात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाने निकाला आधीच रणांगणातून पळ काढला आहे. विधानसभा निकालांवर विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार नाहीत असे फर्मान काँग्रेसने काढले आहे.
हे ही वाचा:
२८ वर्षीय ऋग्वेद कुलकर्णीचे कोरोनामुळे निधन
भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस
मार्च-एप्रिल या दोन महिन्यात झालेल्या पाच विधानसभा निवडणूकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. आज २ मे रोजी या निवडणूकांचे निकाल लागत आहेत. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांपासून ते राज्यपातळीवरच्या वाहिन्यांपर्यंत सर्व ठिकाणी या निकालांवर चर्चा होत आहे. पण या कुठल्याही चर्चे काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झालेले नाहीत. यासाठी पक्षातर्फे कोरोना महामारीचे कारण दिले गेले असले, तरिही कुठल्याच राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या एग्झिट पोल्समध्येही काँग्रेस कुठेच समाधानकारक कामगिरी करताना दिसत नव्हती.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. तर त्यानंतर लगेचच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत पक्षाचे प्रतिनिधी वाहिन्यांवरिल चर्चेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले.