आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधी भाष्य केले आहे. पक्षाच्या एका आंतर्गत बैठकीत पटोले यांनी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेची राज्य कार्यकारणीची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना नाना पटोले यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासंदर्भात वक्तव्य केले.
हे ही वाचा:
पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक
शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप
पंतप्रधान मोदींची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
सावरकर म्हणाले, हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा वाटतो!
या आधी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीदेखील मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढायचा विचार असल्याचे बोलून दाखवले होते. त्यामुळे महाराष्ट्र्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय तडजोड करत एकत्र आलेले तिन्ही पक्ष निवडणुकांत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवापासून काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आणि त्यातून आजही पक्ष सावरताना दिसत नाहीये. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही त्याचीच प्रचिती आली. आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तेत असला, तरीही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात काँग्रेसला अपेक्षित स्थान मिळत नाहीये. पक्षाच्या नेत्यांचडूनही याची वारंवार तक्रार केली जाते. या सगळ्या वातावरणात राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे नाना पटोले हे संघटनेत प्राण फुंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे.