मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणी ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसे यांच्यावर आरोप केले जात असताना ठाकरे गटातील माजी महापौर विनायक पांडे यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणाच्या अधिकच्या चौकशीसाठी पोलिसांनी माजी महापौर विनायक पांडे यांचा जबाब नोंदविला.
ललित पाटील याची अपघातग्रस्त गाडी दुरुस्त करण्यासाठी महापौर विनायक पांडे यांच्या चालकाने त्याला मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. संशयित चालक हा पांडे यांच्या वाहनाचा सुमारे बारा वर्षे चालक होता. मात्र पावणेदोन वर्षापासून तो चालक नसल्याने त्याच्या कृत्याविषयी पोलिसांनी माहिती घेतल्याचे समजते. यासंदर्भात विनायक पांडे यांनी सांगितले की, “पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. त्यानुसार चौकशीसाठी हजर राहून संशयिताच्या कामकाजाची माहिती दिली.”
“संबंधित व्यक्ती आपल्याकडे बारा वर्षे चालक होता. सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी सहा ते दहा या वेळेत चालक म्हणून कार्यरत असायचा. दुपारी मधल्या वेळेत तो काय करत असे याची कल्पना नसल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणार आहे,” असे विनायक पांडे म्हणाले.
हे ही वाचा:
पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!
कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष
या प्रकरणात नाव आल्यानंतर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे विनायक पांडे यांनी स्पष्ट केले होते. राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप विनायक पांडे यांनी केला होता. एकीकडे ललित पाटील प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचे नाव घेत आहे. तर, आता चौकशीतून ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव समोर आल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.