नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीत अनेक ठिकाणी ईडीने केली छापेमारी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीत अनेक ठिकाणी ईडीने केली छापेमारी

सक्तवसुली संचालनालय तथा ईडीने दिल्लीतील विविध ठिकाणी छापेमारी केली असून नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्राच्या मुख्यालयासह अनेक ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड मनीलॉन्डरिंग प्रकरणी चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे. तब्बल १४ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.

मनीलॉन्डरिंग कायद्याच्या अंतर्गत अधिक माहिती गोळा करण्यासाठी ही छापेमारी सुरू केल्याचे ईडीकडून सांगण्यात येत आहे. असोसिएट जर्नल्स लि.च्या अंतर्गत असलेल्या विविध मालमत्तांवर ही छापेमारी केली जात आहे. या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र चालविले जात होते.

सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३मध्ये केलेल्या नॅशनल हेराल्डसंदर्भातील तक्रारीनंतर पीएमएलए म्हणजेच मनी लॉन्डरिंग कायद्याअंतर्गत तपास सुरू झाला. स्वामी यांनी न्यायालयात ही याचिका केली की, ज्या असोसिएटेड जर्नल्स लि.कडून नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रसिद्ध केले जात होते ती कंपनी गैरमार्गाने यंग इंडियन प्रा. लि.मध्ये हस्तांतरित करण्यात आली. यंग इंडियनमध्ये सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलाचे म्हणजे राहुल गांधी यांचे ३८ टक्के समभाग होते.

हे ही वाचा:

माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत

असा झाला ‘तिरंग्या’चा जन्म !

राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं

खुर्ची गेल्यावर आठवला दिलदारपणा!

 

असोसिएटेड जर्नल्स या कंपनीने काँग्रेसकडून ९०.२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते ते वसूल करण्यासाठी यंग इंडियनने केवळ ५० कोटी रुपये देत असोसिएटेड जर्नल्स ही कंपनी ताब्यात घेतली.

सोनिया गांधी यांची नुकतीच यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात आली असून देशभरात काँग्रेसकडून यासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. सोनिया गांधींवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे.

Exit mobile version