महाराष्ट्रातील ५९४ ग्रामपंचायतींचे निकाल लागले आणि त्यात भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र पक्ष म्हणून सर्वाधिक यश मिळविले. शिंदे गटासह जर विचार केला तरीही ही युती जी सध्या राज्याच्या सत्तेत आहे त्यांनी २२८ ग्रामपंचायती जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष म्हणून १३६ जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर आहे तर शिवसेनेला फुटीचा मोठा फटका बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ३७ तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ४० ग्रामपंचायती जिंकता आल्या आहेत.
एकूणच या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गट पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर इतर विजयी ग्रामपंचायतींची संख्या ही तिसऱ्या क्रमांकाची आहे.
नंदूरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांना धक्का बसला. त्यांची पुतणी पराभूत झाली. सातारा जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी यश मिळवले. तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. ६१ पैकी ३० जागी राष्ट्रवादीने यश मिळविले. यवतमाळमध्ये मनसेने खाते उघडताना मारेगाव तालुक्यातील खडणीत ही यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामास सुरूवात
कबुतरांचे दिवस संपले आता चित्त्याची धाव
गौतम अदानींना या दोन प्रसंगांनी घाम फुटला होता
संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेनेही ग्रामपंचायत निवडणुकीत यशस्वी पाऊल ठेवले. नाशिकच्या गणेशगाव ग्रामपंचायतील त्यांनी हे यश मिळवताना रुपाली ठमके यांनी विजय मिळविला.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक यश मिळविले असा दावा प्रसारमाध्यमांकडून आणि तिन्ही पक्षांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात हे तिन्ही पक्ष या निवडणुकीसाठी एकत्र होते असे चित्र पाहायला मिळालेले नाही. तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे प्रतिक्रिया आल्या. त्यातही राष्ट्रवादीने सर्वाधिक यश मिळवत स्वतःची प्रगती करून घेतली आहे. शिवसेनेला मात्र एकनाथ शिंदे ४० आमदारांसह वेगळे झाल्यामुळे अपयश पाहावे लागले आहे.