छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश

छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील पथलगाव येथे १९ आणि २० नोव्हेंबर रोजी भाजपचे राज्य सचिव प्रबळ प्रताप सिंग जुदेव यांच्या नेतृत्वाखाली घर वापसी अभियानाअंतर्गत दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या अभियानाअंतर्गत स्वर्गवासी दिलीप सिंग जुदेव यांनी अशी प्रथा सुरू केली होती की, जे हिंदू धर्माचा स्वीकार करत आहेत त्यांचे पाय धुवून स्वागत करायचे.

प्रबळ सिंग यांनी याबद्दलची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे ‘राष्ट्रीय कार्यात सहभागी होणाऱ्या लोकांचे पाय धुताना माझे डोळे भरून आले आहेत. तुमचे (वडिलांचे) स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य मला मिळाले’ असे सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

४०० कुटुंबांमधून सुमारे १ हजार २०० लोकांनी धर्मपरिवर्तन केले असून त्यांनी ख्रिश्चन धर्मामधून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. १०० कुटुंबे स्थानिक असून ३०० कुटुंबे बसना, सरैपली इथली आहेत. तीन पिढ्यांपूर्वी या कुटुंबांना त्यांच्या असहायतेचा फायदा घेत मिशनरी लोकांनी त्यांचे ख्रिश्चन धर्मात परिवर्तन करून घेतले होते. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना प्रबळ प्रताप म्हणाले, “संघाशी संबंधित आमच्या माणसांनी आणि संस्थेने सातत्याने समुपदेशन केल्यावर या कुटुंबांना समजले की त्यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारून चूक केली आहे.” ते पुढे म्हणाले की, या कुटुंबांना हिंदू धर्मात परिवर्तन करण्यासाठी शुद्धीकरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हिंदी दैनिक ‘दैनिक भास्कर’शी बोलताना प्रबळ प्रताप यांनी सांगितले की, “हिंदुत्व वाचवणे हा माझ्या जीवनाचा एकमेव हेतू आहे.” तसेच मोठ्या संख्येने लोक हिंदू धर्मात परत आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Exit mobile version