पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी अटक करण्यात आली असून त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशखाना प्रकरणात ही अटक झाली आहे. त्याशिवाय, अधिक धक्कादायक म्हणजे इस्लामाबाद न्यायालयाने त्यांना सक्रीय राजकारणात सहभागी होण्यापासून निर्बंध घातले आहेत. पुढील पाच वर्षे ते राजकारणात वावरू शकणार नाहीत.
सत्तेत असताना देशाच्या मालकीच्या अनेक महागड्या वस्तू विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पण न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीला इम्रान खान हजर नव्हते. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेल्या इम्रान खान यांना लाहोर येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यानंतर लाहोरमधून त्यांना इस्लामाबादला रवाना करण्यात आले. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाच्या काळात परदेश दौऱ्यामध्ये मिळालेल्या वस्तूंचा लिलाव केला होता. त्यातून त्यांनी ६ लाख ३५ हजार डॉलर इतकी रक्कम मिळविली होती, असा आरोप आहे.
तेहरीक ए इन्साफचे सरचिटणीस ओमर अयूब खान म्हणाले की, इम्रान खान यांना अटक केल्यानंतर आम्ही त्याविरोधात निदर्शने करणार आहोत. हा आमचा अधिकार आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी इम्रान खान यांची याचिका फेटाळली. आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही असे इम्रान यांनी न्यायालयात सांगितले. त्याविरोधात आपण अपील करणार असल्याचेही त्यांच्या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
भारतीय नौदलाकडून दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन
देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे
लॅपटॉपच्या आयातीवर १ नोव्हेंबरपासून बंदी
कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन जवानांना वीरमरण
इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना १ लाखाचा दंडही केला असून जर हा दंड त्यांनी भरला नाही तर आणखी सहा महिने त्यांना तुरुंगवास सहन करावा लागेल. न्यायाधीशांनी सांगितले की, माजी पंतप्रधानांविरोधातील सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहेत. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती पुरविली त्यामुळे ते भ्रष्टाचारासाठी दोषी ठरले आहेत. तोशखाना भेटवस्तू प्रकरणात त्यांनी खोटी माहिती दिली आहे.
सत्र न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात तोशखाना प्रकरणी खटला सुरू ठेवण्याकरिता निकाल दिल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तो निकाल बाजूला ठेवला होता. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला आणि इम्रान यांना अटक करण्याचे आदेश दिले. हा निर्णय झाल्यानंतर बाहेर जमलेल्या लोकांनी इम्रान खान चोर आहे, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. इम्रान खान यांच्या पक्षाने मात्र न्यायालयाचा हा निर्णय पक्षपाती असल्याचे मत व्यक्त केले.
तोशखाना प्रकरण काय आहे?
पंतप्रधान असताना इम्रान खान यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान ज्या महागड्या वस्तू त्यांना भेट म्हणून मिळाल्या होत्या, त्यांची विक्री करण्यात आली. त्यातून त्यांना ६ लाख ३५ हजार डॉलर इतकी रक्कम मिळाली. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आणि त्याविरोधात खटला दाखल करण्यात आला. २०१८ ते २०२२ या काळात इम्रान खान पंतप्रधान होते. गेल्या वर्षी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना या प्रकरणात अपात्र घोषित केले होते.