मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर टिका होत असलेल्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेंवर आता मनसेनेही टीका केली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा दिल्या जात आहेत? असा सवाल मनसेने केला आहे. त्यामुळे आधीच भाजपाच्या रडारवर असलेले वाझे आता मनसेच्याही निशाण्यावर आले आहेत.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून हा आरोप केला आहे. सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले आहेत.
श्री सचिन वाझे ह्यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचा गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस ह्या त्यांच्या कडेच का सोपवल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 6, 2021
कालच (५ मार्च) विधानसभेत याच मुद्द्यावर बोलत असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वाझेंवर काही आरोप केले होते. “पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे.” असे फडणवीस म्हणाले होते.
हे ही वाचा:
मालकाच्या संशयास्पद मृत्युनंतर ‘अँटिलीया ‘ बाहेरच्या स्कॉर्पिओचे गूढ वाढले.
“हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे त्यांना चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं.” असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.