केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे विधान केले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा यांनी हे वक्तव्य केले आहे कोरोना संपताच देशात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
अमित शहा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सभेमध्ये बोलताना तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र डागले होते. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी ममतांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे ममता दीदींनी असा विचार करू नये की, भाजप पलटवार करणार नाही.
“नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होणार नसल्याची अफवा तृणमूल काँग्रेसकडून पसरविली जात आहे; पण मी स्पष्ट करतो की कोरोना संपताच या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. ममता दीदींना घुसखोरी चालू ठेवायची आहे आणि त्यामुळेच त्या बंगालमध्ये येणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या विरोधात आहेत. ‘सीएए’ ही वस्तुस्थिती आहे आणि राहील,”असे शहा म्हणाले.
हे ही वाचा:
२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम
भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत
बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपावर टीका केली. “भाजपने या कायद्यावर जनतेची चालवलेली दिशाभूल थांबवावी. या देशात सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. त्याशिवाय त्यांना (भारतीय नागरिकत्व असलेले निर्वासित) मतदान कसे करता येईल? शहा हे गृहमंत्री कसे झाले? त्यांनी खोटे बोलायची सवय सोडावी. ‘सीसीए’ आणि ‘एनआरसी’ला आमचा विरोध आहे. नागरिकांना नागरिकत्व देणे हा जनतेला मूर्ख बनिवण्याचा कट आहे,” अशी टीका ममता यांनी केली.