सध्या राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर भारतीय जनता पार्टीने काळजी व्यक्त केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना सध्या फक्त हल्ले करण्यावर भर देत असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रथम आमच्या पोलखोल मोहिमेच्या रथावर आणि स्टेजवर हल्ला केला. त्यांनतर मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तर आज राणा दाम्पत्यांच्या इमारतीजवळ जाऊन शिवसैनिकांनी हल्ला सुरु केला आहे. त्यांच्या अमरावतीतील घराजवळ शिवसैनिक जमून दगडफेक करत आहेत, या सर्व प्रकरणावरून हेच लक्षात येते सध्या ठाकरे फक्त हल्ले करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे भाजपा या सगळ्याचा निषेध करत असल्याचे पाटील म्हणाले.
राज्यात सध्या कायदा व्यवस्थेचे चिंधडे उडवले जात आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिक ओढला जात आहे. त्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने असून, आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी मागणी करत आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’
दिल्ली पोलीस आयुक्तांनी त्या आरोपींना तीन तास शेकवून काढले
तसेच, सध्या हनुमान चालीसावरून राजाकरण तापले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावरून सुद्धा शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणांच्या घराबाहेर थांबणे हे पोलिसांचे काम, शिवसेना कार्यकर्ते तिथे का उपस्थित आहेत, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. राणा दाम्पत्य फक्त मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत, त्यात गैर काय? असाही सवाल पाटील यांनी केला आहे. राणा दाम्पत्य तुमच्या घरी येणार असेल तर तुम्ही त्यांचे स्वागत केले पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.