कोकण आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील पूरग्रस्त नागरिकांसाठी ठाकरे सरकारने मदत जाहीर केली आहे. सरकारने ११,५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचा गवगवा सरकारकडून केला जात आहे. पण या संपूर्ण मदतीचे विश्लेषण पाहिले तर केवळ १५०० कोटी रुपयांची मदत ही तातडीची मदत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारच्या संपूर्ण मदतीची पोलखोल केली आहे.
जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रदेशावर अस्मानी संकट कोसळले. या भागाला बसलेल्या पावसाच्या तडाख्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या सर्व भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केला तेव्हादेखील ते कायमच पॅकेजच्या प्रश्नावर डायलॉगबाजी करत वेळ मारून नेताना दिसले. पण अखेर सरकारने या भागासाठी मदत जाहीर केली पण ही मदत तुटपुंजी असल्याचा आरोप केला जात आहे.
सरकार कडून ११,५०० कोटी रुपयांची मदत केली असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरीही यात तातडीची मदत ही केवळ १५०० कोटी रुपयांची आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर फडणवीसांनी २०१९ साली ते मुख्यमंत्री असताना दिलेली मदत आणि आत्ता ठाकरे सरकारने केलेली मदत यांची तुलना देखील केली आहे.
फडणवीसांचे म्हणणे आहे की २०१९ साली त्यांच्या सरकारने दिलेल्या मदती पैकी अनेक गोष्टींचा या पॅकेजमध्ये उल्लेखच करण्यात आला नाही. ज्यामध्ये छोटे उद्योग, व्यवसाय, हातगाडीधारक, तात्पुरता निवारा व्यवस्था, शेत पिकांचे नुकसान, कृषी पंपाचे वीज बिल, जनावरांचे गोठे इत्यादी गोष्टींसाठी निधी दिल्याचा उल्लेखच नसल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार
ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा
तर या मदतीचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच गोष्टींची स्पष्टता येईल आणि सविस्तर प्रतिक्रिया देता येईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे. पण प्रथमदर्शनी तरी शेतकऱ्यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत दिलेली दिसून येत नाही असे फडणवीस यांनी म्हटले आहे.