थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खंडणीखोरीच्या आरोपात सीबीआय चौकशी व्हावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. डॉक्टर जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचीकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. “थोडी तरी लाज शिल्लक असेल तर देशमुखांनी राजीनामा द्यावा.” अशा कडक शब्दात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची केस आता सीबीआयकडे

केरळच्या चर्चने केला लव जिहादचा दावा

अमित शाहांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले होते. सचिन वाझे याला गृहमंत्र्यांनी महिना १०० कोटी रूपये आणून देण्याचे टार्गेट दिले होते असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला होता. या पत्रावरून डॉक्टर जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुढील पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी करून दखलपात्र गुन्हा आढळल्यास एफआयआर नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. डॉक्टर जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयाबाहेर ही माहिती माध्यमांना दिली. या याचिकेवर सुनावणी करत असताना, अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना, पोलीस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

यावरूनच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली आहे. “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या १००कोटीच्या वसुलीच्या आरोपांची गंभीर दखल घेत याप्रकरणी CBI चौकशीचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.” असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version