“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

जगदीप धनखड यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरून किरेन रिजिजू यांनी विरोधकांना सुनावले

“अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही”

विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीने मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव वरिष्ठ सभागृहाच्या महासचिवांकडे सादर केला. यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवार, ११ डिसेंबर रोजी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जर विरोधकांनी अध्यक्षांच्या प्रतिष्ठेवर हल्ला केला तर आम्ही त्याचे संरक्षण करू.

सभागृहाची बैठक झाल्यानंतर लगेचच किरेन रिजिजू म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपती झाले आहेत आणि संपूर्ण देशाने पाहिले आहे की त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा राखली आहे. तुम्ही अध्यक्षांचा आदर करू शकत नसाल तर तुम्हाला या सभागृहाचे सदस्य राहण्याचा अधिकार नाही. आपण देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाची शपथ घेतली आहे, असे म्हणत किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

किरेन रिजिजू यांनी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस यांच्यातील कथित संबंधांचा मुद्दाही उपस्थित केला. शिवाय काँग्रेस भारतविरोधी शक्तींसोबत उभी असल्याचा दावाही त्यांनी केला. “देशाच्या विरोधात असलेल्या शक्तींच्या पाठीशी तुम्ही उभे आहात. अध्यक्षांच्या विरोधात नोटीस देण्यात आली आहे. असा अध्यक्ष मिळणे अवघड आहे. त्यांनी नेहमीच गरिबांच्या हिताची, संविधानाच्या रक्षणाची भाषा केली आहे. नोटीसचे नाटक आम्ही होऊ देणार नाही. सोरोस आणि काँग्रेसचे काय संबंध आहेत? हे उघड झाले पाहिजे. काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे,” असं म्हणत रिजिजू यांनी विरोधकांसह काँग्रेसची कान उघडणी केली.

हे ही वाचा : 

दिल्ली विधानसभेसाठी ‘आप’ची काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता नाहीचं!

ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट मोजणीमध्ये तफावत नाहीच

आरोपी बस चालकाला संतप्त नागरिकापासून असे वाचवले पोलिसांनी

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात कॅनेडियन हिंदूंकडून बांगलादेशी वाणिज्य दूतावासाबाहेर निदर्शने

रिजिजू यांच्या भाषणाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी सदस्य उभे राहिल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडी’ आघाडीने मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव वरिष्ठ सभागृहाच्या महासचिवांकडे सादर केला. मंगळवारी लोकसभेचे आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Exit mobile version