काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळावर लढण्याच्या आणि पाळत ठेवण्याच्या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. काल शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक वर बैठक झाली. यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळाली आहे. “तुम्ही वेगळेच लढणार असाल तर आधीच सांगा, आम्हालाही तयारीला लागता येईल.” असं ते म्हणाले.
जर दिल्लीवरून ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही किंवा नाना पटोलेंना अधिकार दिले असतील तर तसंही सांगा, असं शरद पवार म्हणाले असल्याची माहिती आहे. शरद पवार म्हणाले की, पक्ष वाढवण्यासंदर्भात कोणाच्याही मनात दुमत नाही पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीला या सर्व घटनाक्रमाचे कर्ताधर्ता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र गैरहजर होते.
शरद पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केलं असतं असा टोला देखील त्यांनी लगावला होता. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध नाही. आम्हा तिन्ही पक्षाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असंही ते म्हणाले होते.
हे ही वाचा:
पुलावाममध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
शिवसेनेतून मोठ्या नेत्यांची एग्झिट सुरूच
पाकिस्तानी सैन्यावर तालिबानकडून हल्ला?
‘ब्राऊनी केक’ प्रकरणी सायकॉलॉजिस्ट अटकेत
दरम्यान नाना पटोले यांनीच एकत्र चालवत असलेल्या सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर, ते काँग्रेस पक्षावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे ठाकरे सरकारमधील आणि महाविकास आघाडीतील पक्षांमधील एकी किती आहे हे दिसून येत आहे.