मुख्यमंत्रिपद देत असाल तर ठीक, नाही तर मी आमदारच बरा!

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या डी. के. शिवकुमार यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्रिपद देत असाल तर ठीक, नाही तर मी आमदारच बरा!

BENAGLURU, INDIA - MAY 21: Congress leader DK Shivkumar looks on during the death anniversary program of Rajiv Gandhi at Karnataka Pradesh Congress Committee on May 21, 2018 in Bengaluru, India. (Photo by Arijit Sen/Hindustan Times via Getty Images)

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले डी . के. शिवकुमार यांनी ‘मुख्यमंत्रिपद देत असाल तर ठीक नाही तर मी आमदारच बरा,’ असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सांगितले असल्याचे समजते. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धारमय्या यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा चांगला नव्हता. राज्यातील प्रमुख समुदाय लिंगायत त्यांच्या विरोधात होता, असे शिवकुमार यांनी खरगे यांना सांगितल्याचे समजते.

कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी मंगळवारीही काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वप्रथम राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर खरगे यांनी डी. के. शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शिवकुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांच्यासमोर व्यक्त केली. २०१९ मध्ये सरकार पडल्यानंतर त्यांनी पक्षाच्या पुनर्निर्माणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे खरगे यांना सांगितले. तसेच, सिद्धारमय्या यांना याआधी मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे, त्यामुळे आता त्यांना संधी द्यायला हवी, असे ते म्हणाले.

बुधवारीही होणार वरिष्ठ नेत्यांची बैठक

सूत्रांनी सांगितल्यानुसार, खरगे हे यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समवेत बुधवारी गुप्त मतदानाच्या निकालावर चर्चा करतील. त्यानंतर कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल. सध्या सोनिया गांधी शिमला येथे आहेत. तरी खरगे यांच्या घरात बुधवारी वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून तिथे एकमताने निर्णय घेतला जावा, असा प्रयत्न केला जाणार आहे.

हे ही वाचा:

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आसामच्या वादग्रस्त ‘लेडी सिंघम’चा अपघाती मृत्यू

‘द केरला स्टोरी’मध्ये द्वेषयुक्त भाषण; प. बंगाल सरकारचा दावा

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

राजीनाम्याचे वृत्त फेटाळले

मंगळवारी संध्याकाळी प्रथम शिवकुमार हे खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे ते अर्धा तास होते. ते गेल्यानंतर सिद्धारमय्या तिथे पोहोचले. ते तिथे सुमारे एक तास होते. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली नाही. ही भेट घेण्याआधी शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्नाटकच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वृत्त फेटाळून लावले. ‘काँग्रेस पक्ष माझे मंदिर आहे. काँग्रेस पक्ष आमची सर्वांत मोठी ताकद आहे. त्यामुळे कोणाला चिंता करण्याची गरज नाही. काँग्रेस माझ्या आईसारखी असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version