लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक पक्षांनी आपल्या काही उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. भाजपानेही महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपातर्फे कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने या जागेसाठी उमेदवार दिलेला नाही. जागा वाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचे सध्या मविआमध्ये चित्र आहे. अशातच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ही जागा शरद पवार गटाला दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मविआ समोरचा पेच आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे कपिल पाटील हे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. कपिल पाटील यांना लढत देण्यासाठी अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित होत नसल्याचे चित्र आहे. अशातच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाला ही जागा दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मविआमधील अंतर्गत वाद भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
भाजपाचे कपिल पाटील हे लोकप्रिय नेते खासदार म्हणून सलग दोनदा निवडून आलेले आहेत. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच आगरी समाजाला केंद्रीय मंत्रीपद मिळाले होते. अशातच भाजपाकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळताच कपिल पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवाय त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाटील यांच्या विरोधात उमेदवार निश्चित करण्यात महाविकास आघाडीला यश येताना दिसत नाही.
हे ही वाचा:
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू
वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित
ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स
भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र गेल्या काही निवडणुकीत इथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून या जागेची मागणी केली जाते आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास आता काँग्रेसने विरोध केला आहे. कोकण विभागात ही एकमेव जागा आता काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच द्यावी अन्यथा शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा बदलापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. काँग्रेसचे संजय जाधव यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे उमेदवार निश्चित होण्याआधीच महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र आहे.