महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार यांना ठाऊक आहे, असे सूचक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. विझण्यापूर्वी दिवा जसा मोठा होता, त्याप्रमाणे सध्या महाविकासआघाडीची फडफड सुरु आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

आम्ही किंवा त्यांनी कोणीही अहंकार बाळगण्याची गरज नाही. कालचक्र हे फिरत असतं. १५ वर्षे त्यांची सत्ता होती, ती जाऊन पाच वर्षे आमची सत्ता आली होती. आता पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे कुणीही अमरपट्टा घालून आलेले नाही. महाविकासआघाडीचं सरकार कधी आणि कसं पडणार, हे अजित पवारांना नेमकेपणाने ठाऊक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पंढपरपूरची पोटनिवडणूक महाविकासआघाडीच्या हातातून गेली आहे. त्यामुळे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागते. हा अजित पवारांचा स्वभाव नाही. हा स्वभाव शरद पवार यांचा आहे. हे निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याचं लक्षण आहे. अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसत आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हे ही वाचा:

मेडिकलची परीक्षा पुढे ढकलली, काय आहेत नव्या तारखा?

संजय राऊत अमेरिका आणि इंग्लंडच्या अध्यक्षांनाही सल्ला देऊ शकतात- चंद्रकांत पाटील

कोविडच्या काळात ‘या’ कंपन्यांमध्ये हजारो नव्या नोकऱ्या

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही- डॉ. हर्षवर्धन

शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Exit mobile version