महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या आरोप- प्रत्यरोपांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली, शिवाय त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे वक्तव्य देखील त्यांनी केले.
इतर शहरांच्या आयुक्तांना काय सांगितलं?
राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडताना “इतर शहरांच्या पोलिस आयुक्तांना काय सांगितलं ते अजून बाहेर आलेलं नाही. त्यामुळे अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.” असे सांगितले. “त्याबरोबरच पोलिसांकडून वेगवेगळ्या बातम्या येतात आणि यात मूळ विषय बाजूला राहतो. या प्रकरणात अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवली कोणी हा मूळ विषय आहे, त्याकडे दुर्लक्ष होऊ नये.” असे देखील ते म्हणाले.
हे ही वाचा:
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावरून शरद पवारांची टोलवाटोलवी
पवार साहेब विंडो ड्रेसिंग नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा हवा
परमबीर सिंग यांची बदली का केली? त्यांची चौकशी का नाही?
राज ठाकरे यांनी यावेळेला परमबीर सिंग यांच्या बदलीबाबतही सवाल उठवला. या बदली मागचं कारण कळलं पाहिजे. त्यांचा जर या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध असेल तर बदली का केली? चौकशी का नाही केली? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले. यावेळी या संपूर्ण प्रकरणात जिलेटिन आले कुठुन याचा तपास देखील झाला पाहिजे असे ते म्हणाले.
सचिन वाझे ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबीत झाला होता. त्यानंतर त्याला शिवसेनेत कोणी नेले हे पहायला हवे असेही ते म्हणाले.
स्फोटके ठेवायला कोणी सांगितली?
यावेळी त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी स्फोटकं ठेवण्याचं धाडस केलं? असा प्रश्न देखील उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे जवळचे संबंध असताना त्याठिकाण कोणीतरी सांगितल्या शिवाय पोलिस बाँबस्फोटकं ठेवण्याचं धाडस करणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्रात होणं शक्य नाही. त्यामुळे केंद्राने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मी विनंती करतो असेही ते म्हणाले. ‘जर केंद्राने या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी केली तर फटाक्यांची माळ फुटेल. कोणकोण आत जाईल सांगता येत नाही’ असेही ते म्हणाले. त्याबरोबरच, या प्रकरणाची योग्य चौकशी झाली नाही तर लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल असेही ते म्हणाले.
यावेळी गाडीत सापडलेल्या कथित पत्रावर देखील त्यांनी टिका केली. या पत्रात आदरार्थी उल्लेख असल्याने या पत्रावर देखील त्यांनी शंका उपस्थित केली. खुद्द अंबानी यांची स्वतःची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असताना हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून हे करण्यात आले, ते समजले पाहिजे असे ते म्हणाले. पोलिस बाँब ठेवतात, किंवा त्यांना तसं करायला भाग पाडलं जातं हे सामान्य नाही. जो विचार अतिरेकी करतात, तो विचार करायला पोलिसांना कोणी भाग पाडलं हे कळलं पाहिजे, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.