भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय. अनिल देशमुख यांनी दरोडा घालायचा आणि मग पोलिसांनी त्यांना अटक करायची नाही, तर काय हार घालायचा का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय. तसेच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मार्ग खुले असल्याचं सांगत आमच्या पाठीत खंजीरच खुपसला होता, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. चंद्रकांत पाटील आजपासून (२ सप्टेंबर) दोन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळाली की नाही याची चौकशी आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि मग पोलिसांनी अटक करायची नाही, तर काय हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असं म्हणायचं का? त्यामुळे सीबीआयने काय करावं, न करावं हा माझा विषय नाही. हे काय चाललं आहे. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होते आहे. मग उगाच जप्त होत आहे का?”
हे ही वाचा:
अनिल देशमुखांच्या वकिलालाच अटक
भारत ओव्हलवर ५० वर्षांचा इतिहास मोडीत काढणार?
“आमच्या पाठीत खंजीर खुपसलाच आहे. विधानसभा निवडणुकी आधी युती करायची, मोदींच्या नावानं मतं मागायची आणि जागा जिंकून आल्या की काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं. विधानसभा निकाल लागत होते त्या दिवशी ४ वाजता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी पुण्यातून येत होतो. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ४ वाजताची पत्रकार परिषद तुमची तुम्ही करा आणि माझी मी करतो असं म्हटले. तिथेच गडबड झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी सर्व मार्ग मोकळे आहेत असं म्हटलं, मग आधी युती का केली? हा विश्वासघात आहे की नाही? विश्वासघाताचंच नाव पाठित खंजीर खुपसणं आहे. त्यात मी चुकीचं काय म्हटलं?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.