देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबंधित राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले आहेत. शाह यांनी सर्व पाकिस्तानी नागरिकांबद्दल केंद्राला माहिती देण्यास सांगितले असून जेणेकरून त्यांचे व्हिसा रद्द करता येतील. मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानी लोकांना पाकिस्तानात लवकर परतण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.
भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेले सर्व विद्यमान व्हिसा रद्द केल्यानंतर एका दिवसानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून शेजारील देशातील नागरिकांना ओळखून त्वरित बाहेर काढण्याचे निर्देश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर, अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना हद्दपार करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास सांगितले. केंद्राने पुढे म्हटले आहे की वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अतिरिक्त दोन दिवस मिळतील परंतु त्यांना २९ एप्रिलपर्यंत देश सोडावा लागेल.
भारत सरकारने बुधवारी जाहीर केले की पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच SVES व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी देण्यात आला होता. २४ एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द केले जात आहेत. “पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिलपर्यंत वैध असतील. सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा लागेल, जसे की आता सुधारित केले आहे,” असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हे ही वाचा:
प. बंगालच्या आसनसोलमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
मानहानी खटला प्रकरणी मेधा पाटकर यांना अटक
दहशतवाद्यांना ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणणाऱ्या उपपंतप्रधानांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतापला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करून २६ जणांचा बळी घेतल्यानंतर इस्लामाबादविरुद्ध भारताच्या आक्रमक भूमिकेचा भाग म्हणून १९६० च्या सिंधू पाणी कराराला विराम देण्यापासून ते अटारी लँड-ट्रान्झिट पोस्ट बंद करण्यापर्यंत आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.