मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही

मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे सभा झाली. या सभेत त्यांनी ममता बॅनर्जीवर जोरदार हल्ले चढवले. यावेळेला दीदी आत्तापासूनच ईव्हीएमला दोष देत आहे, म्हणजे ती आत्तापासूनच पराभवाला घाबरली आहे असे मोदी म्हणाले.

बंकुरा येथील विशाल सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, जर बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन झाले, तर ‘आशोल पॉरिबर्तन’ घडवेल.

“जर भाजपाचे सरकार स्थापन झाले तर आशोल पॉरिबर्तन घडवेल. भ्रष्टाचार चालणार नाही. सिंडिकेटचा खेळ चालणार नाही. कमिशनचा खेळ चालणार नाही. भाजपा सरकार आल्यानंतर आईची आणि मातीची पूजा होईल, माणसाचा सन्मान होईल.” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

“मी जेवढे दीदींना प्रश्न विचारतो, तेवढ्या त्या त्रस्त होत जातात. आजकाल त्यांना माझा चेहरा आवडत नाही. दीदी ही लोकशाही आहे. ही लोकांची सेवा आहे आणि केवळ चेहऱ्यावर काम होणार नाही.” असेही ते म्हणाले.

दीदींच्या ईव्हीएमवर देखील मोदींनी जोरदार टीका केली. मोदींनी त्यांना आठवण करून दिली की याच ईव्हीएमच्या आधारे तुम्ही मागची १० वर्षे सत्तेत राहिला आहात. मोदी म्हणाले, “त्यांना आपला पराभव होताना दिसत आहे. बंगालमधल्या प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे.”

मोदींनी बंगालच्या रस्त्यावर काढल्या गेलेल्या ग्राफिटीचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, “दीदीच्या माणसांनी बंगालच्या रस्त्यावर ग्राफिटी काढली आहे. ज्यात दीदी माझ्या डोक्याला लाथ मारून फुटबॉल खेळत आहे. दीदी, तुम्ही बंगालच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा अपमान का करत आहात?” पुढे ते म्हणाले, “तुम्ही एकवेळ माझ्या डोक्यावर पाय ठेवून लाथ मारा. परंतु दीदी मी तुम्हाला बंगालच्या लोकांच्या विकासाला आणि स्वप्नांना लाथ मारू देणार नाही.”

तृणमुलने लोकांच्या केलेल्या विश्वासघातावर देखील त्यांनी टीका केली ते म्हणले, “दीदी, गेल्या दहा वर्षात पोकळ आश्वासनांव्यतिरिक्त तुम्ही दुसरं काय दिलं? तुम्ही दावा केलेलं काम आहे कुठे?”

“मी तुम्हाला प्रथमच मत देऊन स्वप्नातला शोनार बांगला सत्यात उतरवा असे सांगत आहे. डावे, काँग्रेस आणि टीएमसी यांनी मागच्या पिढ्यांचा बहुमुल्य वेग वाया घालवला आहे. मी तुम्हाला तुमचे भविष्य बिघडवू देऊ शकत नाही.” असेही ते म्हणाले.

बंगालच्या २९४ जागांसाठी विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला २७ मार्चपासून सुरूवात होणार आहे तर २९ एप्रिल रोजी शेवटचा टप्पा पार पडणार आहे. आठ टप्प्यात ही निवडणुक पार पडणार आहे. दिनांक २ मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version