ईडीने अटक करूनही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पदाचा राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. गरज पडल्यास तुरुंगातून सरकार चालवेन,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीच्या मद्यघोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने केजरीवाल यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावल्यानंतर इंडिया टुडेने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी ‘मी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. आवश्यकता भासल्यास तुरुंगातून सरकार चालवेन. मी आत असेन किंवा बाहेर, सरकार तुरुंगातून चालवेन,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली न्यायालयात तब्बल तीन तास या प्रकरणी सुनावणी सुरू होती. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. ईडीने त्यांच्याकडे १० दिवसांची कोठडी सुनावली. सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने मद्यघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवालच होते, असा दावा केला. तसेच, अन्य आप मंत्री आणि पक्षनेते यात सहभागी होते, असा आरोप केला.
केजरीवाल यांनी ईडीच्या अटक कारवाईविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात सादर करण्यात आले. दिल्ली मद्यधोरण सन २०२१-२२ची अंमलबजावणी करण्यासाठी केजरीवाल यांना ‘साउथ ग्रुप’कडून कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अस्तित्वावर संकट
टीएमसीच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या संबंधित ठिकाणांवर सीबीआयकडून धाडसत्र
सीएए लागू झाला नसता तर भाजपचे बंगालमध्ये झाले असते नुकसान
इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; ६० जणांचा मृत्यू
केजरीवाल यांची बाजू न्यायालयात मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक होत आहे, असे सांगितले. ‘अटक करण्याचे सामर्थ्य आणि अटकेची गरज हे समानपातळीवर असू शकत नाही. या व्यक्तीला अटक करण्याची काहीही गरज नव्हती,’ असे सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले.