काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवारांशी काँग्रेस नेत्यांच्या भेटीसंदर्भात नाना पटोले म्हणाले की, मला तिथं आमचे नेते गेलेले माहितीही नव्हतं. मला आमंत्रणही नव्हतं. माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे. माझ्या पक्षाचं काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही.
नाना पटोले यांनीच, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर (काँग्रेसवर) पाळत ठेऊन आहेत.” असा खळबळजनक आरोप लोणावळ्यात एका सभेत त्यांनी केला होता. त्यामुळे ठाकरे सरकार आणि त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादीवर हा थेट हल्ला पटोले यांनी केला होता. शिवाय त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या अनेक वक्तव्यानंतरच काल शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा:
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत
‘त्या’ दिव्यांगाच्या कुटुंबाला द्या ५० लाख
वाहतूक पोलिसांचे ई चलान मशीनच चोरले
पुलावामामध्ये लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
नाना पटोलेंची वक्तव्य ही महाविकास आघाडीत फूट पडणारी असून त्यांनी जपून बोलावं असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारच म्हणाले होते. तर पटोलेंच्या या वक्तव्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी तीन पक्षांच्या या आघाडीवर हल्लाबोल केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, नानांच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली, म्हणूनच त्यांनी पाळत ठेवली असावी. अशी प्रतिक्रिया दिली होती.