ठाकरेंच्या चार पिढ्या पाहिलेल्या मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द कशी होती?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

ठाकरेंच्या चार पिढ्या पाहिलेल्या मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द कशी होती?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. बुधवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची विशेष ओळख होती. मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी पुढील शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. शिक्षण घेत असताना त्यांनी एका क्लासेसमध्ये शिपायाची नोकरी केली. किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. पुढे मनोहर जोशी एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली होती.

१९६७ मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले. मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे. कालांतराने मनोहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते. राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता. बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत.

मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते. मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले. १९९५ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी यांची राजकीय ताकद वाढली. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली पसंती होती. त्यांनी तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शरद पवार यांची जागा घेतली होती. राज्याची सत्ता शिवसेनेच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ होती.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेशखाली येथील पीडितांची घेणार भेट!

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; एक मृत्यू, १२ पोलिस आणि ५८ शेतकरी जखमी

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

मनोहर जोशी हे मे २०२३ पासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यांना हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Exit mobile version