मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर लोकांमध्ये काही संभ्रम कायम
शिवथाळी मोफत मिळणार पण ती घ्यायला कसे जायचे, असा मजेशीर प्रश्न सोशल मीडियावर सध्या फिरतो आहे. विनोदाचा भाग सोडला तरी ते वास्तवही आहे. शिवथाळी आता महिनाभर मोफत मिळणार असे म्हटले असले तरी या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणापर्यंत लोकांना जायचे कसे हा प्रश्न आहेच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधताना काही निर्बंधांची माहिती दिली मात्र त्यात अनेक गोष्टी या संभ्रमात भर टाकणाऱ्या आहेत. पुढील १५ दिवसांसाठी हे निर्बंध महाराष्ट्रात लागू होणार आहेत.
एकीकडे हॉटेल्समधून पार्सलची व्यवस्था केली असली तरी ते पार्सल घेण्यासाठी हॉटेलपर्यंत कसे जायचे हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. ही पार्सल व्यवस्था केवळ अत्यावश्यक सेवेत असलेल्यांसाठीच खुल्या आहेत का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो. कारण अत्यावश्यक सेवेत असलेल्यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग खुला आहे. त्यामुळे केवळ हेच लोक या पार्सल सेवेचा लाभ घेऊ शकतात, असाच त्याचा अर्थ होतो.
मेडिकल दुकाने उघडी ठेवण्यात येणार असली तरी अनेक औषधे ही मोठ्या मेडिकल दुकानांतच उपलब्ध होतात. त्या दुकानांपर्यंत जाणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे का, संचारबंदीमुळे या लोकांना तिथपर्यंत जाणेच शक्य नसेल किंवा पोलिसांनी जाऊ दिले नाही तर काय करायचे, यासंदर्भातही लोक विचारणा करत आहेत.
बँका सुरू आहेत पण त्या बँकेत जाण्यासाठी लोकांना परवानगी आहे का? कार्यालये, बँकांत अभ्यागतांना मनाई करण्यात आली आहे मग लोकांनी बँकेत जायचे कसे असा सवाल निर्माण होतो. अनेकांना पेन्शनची रक्कम किंवा बँकेतील जमा काढण्यासाठी बँकेत जावे लागते. काही बँकांची एटीएमही नाहीत किंवा वृद्धांना एटीएमने पैसे काढण्याची सवय नाही त्यांना बँकेत जाण्याशिवाय पर्याय नाही त्यांनी काय करायचे?
हे ही वाचा:
अनिल देशमुखांची आज सीबीआय चौकशी
लस उत्सवात लसीकरणाचा नवा विक्रम, लसीकरण किती झाले? वाचा सविस्तर
आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील- मनोज कोटक
मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली
रिक्षा, टॅक्सीतून ठराविक क्षमतेने माणसे नेण्याचा नियम करण्यात आला आहे. पण या वाहतूक सेवेचा लाभ नक्की घेणार कोण, हा सवालही आहे. लोकांना संचारबंदीमुळे बाहेर पडणेच मुश्किल असेल आणि सगळी दुकाने, आस्थापना बंद असतील तर लोक या वाहतूक सेवेचा लाभ तरी कसा घेणार? की ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्यांसाठीच खुली आहे का? रिक्षातून केवळ चालक आणि दोन जणांना तर टॅक्सीत किवा चार चाकी वाहनात चाल आणि त्या वाहनाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना नेता येणार आहे. बसेसमध्येही उभ्याने प्रवास नाकारण्यात आला आहे. पण हा नियम सर्वसामान्यांसाठी आहे की केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी हे स्पष्ट झालेले नाही.