मुंबईत कोविड-१९ च्या केसेस वाढत आहेत. मुंबईतील वाढत्या कोविड-१९ संसर्गासाठी नागरिकांना दोषी ठरवत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना ‘बेजबाबदार’ असे संबोधले होते. यावर, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन घरात दोन कुटुंब सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः उपस्थित राहून का केले?” असा तिखट सवाल भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा… pic.twitter.com/VfmfKhllmw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 2, 2021
मुंबई आणि महाराष्ट्रात कोविड-१९ च्या केसेस गेला महिनाभर सातत्याने वाढत आहेत. या परिस्थितीत निर्बंध कठोर करण्यासाठी सरकार तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत वाढत्या कोविड-१९ केसेससाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘बेजबाबदार’ नागरिकांना दोषी ठरवले आहे. किशोरी पेडणेकरांच्या या वक्तव्यावरच भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे.
“मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.
हे ही वाचा:
सचिन वाझे प्रकरणात आता एका महिलेची एंट्री
पुण्यातील संचारबंदीला भाजपाचा विरोध
महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल
वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा
३१ मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या उदघाटन समारंभाला स्वतः उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या घरातील दोन व्यक्ती म्हणजेच त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोविड-१९ ची लागण झाली असताना मुख्यमंत्री घराबाहेर पडून या समारंभाला गेलेच कसे? असा सवाल या ट्विटमधून अतुल भातखळकरांनी केला आहे.