अकेला देवेंद्रने काय करून दाखवले ते बघितले ना?

जपानहून फडणवीसांनी महाराष्ट्रावर लक्ष ठेवले

अकेला देवेंद्रने काय करून दाखवले ते बघितले ना?

‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागे देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे वारंवार होत होते. अर्थात, देवेंद्र फडणवीसांची अशी हेटाळणी करण्याची गरज त्यांच्या विरोधकांना होती कारण भाजपाला आणि पर्यायाने फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवणे हा विरोधकांचा उद्देश होता. २०१९ला महाविकास आघाडीचे सरकार आले त्याचा प्रमुख उद्देश हाच होता. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा ओळखून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हा महाविकास आघाडीचा प्रयोग आखला आणि अडीच वर्षे ते महाराष्ट्रात राहिले.

 

पण या अडीच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीसच केंद्रस्थानी राहिले. महाविकास आघाडीला सळो की पळो करून सोडण्यात फडणवीस हे एकटेच आघाडीवर असल्याचे दिसले. कधी अंबांनींच्या घराखालील स्फोटकांचे प्रकरण तर कधी गृहमंत्री अनिल देशमुखांची केलेली कोंडी नंतर तुरुंगवास, नवाब मलिकांविरोधातील खणखणीत आरोप आणि त्यातून त्यांच्यावर आलेली तुरुंगवासाची वेळ. हे सगळे फडणवीसांनी अत्यंत कठोरपणे केले आणि सरकारची वेळोवेळी कोंडी केली. तेवढेच नाही तर त्यावेळी कधीही आक्रस्ताळी भूमिका घेतली नाही. जे मनात आहे ते ओठावर येऊ दिले नाही. ते करून दाखविले. नंतर शिवसेनेतील मतभेदाचा फायदा त्यांनी उठवला आणि एकनाथ शिंदेंना काही आमदारांसह आपल्याकडे वळवले. राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकात अतिरिक्त उमेदवार देऊन त्यांनी बाजी मारून दाखविली. एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि नंतर अजित पवारही त्यांना येऊन मिळाले. फडणवीसांना ज्या पक्षांनी विरोध केला त्याच पक्षातील मोठा गट त्यांनाच येऊन मिळाला. त्यावरून फडणवीस यांची राजकारण खेळण्याची शैली, धाटणी विरोधकांच्या लक्षात आली असेल. म्हणूनच फडणवीस हे त्यांच्या मार्गातील नेहमीच अडथळा राहिले.

 

 

फडणवीस यांच्या या क्षमतेची चुणूक पुन्हा एकदा दिसली. सध्या देवेंद्र फडणवीस हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहायचे आहे. मात्र असे असतानाही त्यांचे महाराष्ट्राकडे लक्ष आहेच. ते बाहेर गेलेत म्हणजे इथे आपल्याला काहीही करता येईल, महाराष्ट्रातील सरकारला गुंडाळता येईल, अडचणीत आणता येईल, असा विचार विरोधकांनी केला. त्यातूनच मग इथे सुरू झालेल्या कांदा आंदोलनाला हळूहळू धार चढू लागली.

 

 

केंद्र सरकारने निर्यातीवरील कर ४० टक्के केल्यानंतर कांदा उत्पादकांचे नुकसान होते आहे, यावरून विरोधकांनी महाराष्ट्रभर आंदोलनाचे अस्त्र उपसले. शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे असा दावा करत निर्यातीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली जाऊ लागली. एरवी टॉमेटोच्या दरात वाढ झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोय हे कुठेही ते म्हणत नव्हते तेव्हा मात्र ग्राहकांच्या खिशाला वाढत्या दरांमुळे कशी कात्री लागते आहे, अशी भाषा याच विरोधकांकडून वापरली जात होती. पण कांदाप्रश्नी मात्र त्यांनी शेतकऱ्यांचे हित दिसू लागले, तेव्हा सर्वसामान्य ग्राहकांचे हित त्यांना दिसत नव्हते. मात्र या कांदाप्रश्नाचे भांडवल करण्यासाठी त्यांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अर्थात, फडणवीस जरी महाराष्ट्रात नव्हते, जपानला होते तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्रात होते, असेच म्हणावे लागेल.

 

कांदाप्रश्नी कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीला जाणार, तिथे केंद्रीय मंत्र्यांशी भेट घेणार याची चर्चा रंगू लागली होती. तिथे जाऊन निर्यातकराबाबत चर्चा करू वगैरे बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. तसे मुंडे हे दिल्लीला गेलेही आणि तिथे त्यांची भेट वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी झाली. मात्र या भेटीतून काय निष्पन्न होते हे समजण्याआधीच सकाळी १०.३० वाजता फडणवीसांचे जपानहून ट्विट आले की, माझे केंद्रीय मंत्री अमित शहा, पियुष गोयल यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यानुसार सरकार कांदा खरेदी करणार आहे. कांदा उत्पादकांना २४१० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येईल. त्यानुसार लगेच केंद्रीय मंत्री भारती पवार या नाशिकला खरेदीकेंद्रांवर गेल्या. व्यापाऱ्यांशी चर्चा झाली आणि कांदा देण्यासाठी व्यापारी तयार झाले. हे सगळे फडणवीस यांनी जपानवरूनच केले.

हे ही वाचा:

देशात साजरी झाली दिवाळी!

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

सनी देओलच्या ‘गदर’ची ४०० कोटींच्या क्लबमध्ये धडक

मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

म्हणजे थोडक्यात सांगायचे तर ते जपानला गेलेत म्हणून महाराष्ट्राकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असे अजिबात नाही. त्यांनी आंदोलनाची ही स्थिती बघून लगेच हालचाली केल्या आणि केंद्राशी बोलून तोडगाही काढला. उद्धव ठाकरे अभिमानाने म्हणत की, मी घरात बसून महाराष्ट्र चालवला. पण तसे कुणालाही करता येत नसते. तरीही त्याची वारेमाप स्तुती झाली होती. देवेंद्र हे मैदानात उतरून काम करणारे नेते आहेत पण परदेशात आहेत म्हणून त्यांचे जमिनीशी नाते तुटते असे अजिबात नाही, हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे विरोधकांचा चांगलाच हिरमोड झाला असेल. ज्या फडणवीसांना हटविण्यासाठी आकाशपाताळ एक करत आहोत, ते महाराष्ट्रात असतील तर अडथळा ठरतातच पण परदेशात असतील तरीही ते आपल्याला आवरता येत नाहीत. अकेला देवेंद्र क्या कर सकता है, याची ही चुणूकच म्हणायची की नाही?

Exit mobile version