केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज (जी.एच.टी.सी) या प्रकल्पांतर्गत लाईट हाऊस प्रोजेक्ट (एल.एच.पी)चा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. जगभरातील विविध शाश्वत आणि आपत्ती रोधक तंत्रज्ञान शोधणे आणि त्याचा वापर करुन घेणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असेल. एकाच वेळेस सहा केेंद्रांवर या प्रकल्पाचा पाया घालण्यात आला
या प्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, ही सहा केंद्रे देशाला गृहनिर्माण प्रकल्प देतील त्याबरोबरच केंद्र-राज्य समन्वय बळकट करतील. यापूर्वीच्या कोणत्याच सरकारने गृहनिर्माण प्रकल्पांवर भर दिला नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. आता देशाचा गृहनिर्माण प्रकल्पांकडे बघण्यचा दृष्टिकोन बदलला असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. देशाला अधिक उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान का मिळू नये? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जी.एच.टी.सी प्रकल्पात तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या ५० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांचे संशोधन सहा वेगवेगळ्या शहरांत वापरले जाणार आहे. अगरताळा, लखनौ, इंदोर, राजकोट, चेन्नई आणि रांची ही सहा विविध केंद्रे आहेत. या सहा विविध केंद्रांवर जगातल्या विविध देशांतील बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.