शिवसेनेच्या नेत्याने सांगितले म्हणून हॉटेल पाडले

शिवसेनेच्या नेत्याने सांगितले म्हणून हॉटेल पाडले

नाशिकमधील एका हॉटेलवर उच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीच कारवाई होऊन हॉटेल जमीनदोस्त करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगापूर रोडवरील नामांकित मॉडर्न कॅफे हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत हे बांधकाम जमीनदोस्त केले. या कारवाईविरोधात हॉटेल मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, त्या सुनावणीपूर्वीच ही कारवाई केल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले झाले आहे.

याप्रकरणी महापालिका आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही कारवाई मुंबईतील एका शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची चर्चा असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

गंगापूर रोडवरील मॉडर्न कॅफेच्या बांधकामाबाबत हॉटेल शेजारच्या प्लॉट मालकाने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, सिडकोचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर यांच्या पथकाने तात्काळ याची दखल घेत मंगळवारी हे हॉटेल जमीनदोस्त केले. विशेष म्हणजे ही कारवाई होऊ नये म्हणून हॉटेल मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हे ही वाचा:

चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

बारामतीत ‘शून्य’ स्वच्छता

आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब

मुंबईत पावसाची हजेरी!

मॉर्डन कॅफे संदर्भातल्या याचिकेवर मंगळवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होती. सुनावणीपूर्वीच हे हॉटेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयुक्त कैलास जाधव यांना अवमान याचिकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने सांगितले आणि त्यांच्या सांगण्यावरच ही कारवाई झाल्याची चर्चा असून हा नेता कोण आहे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version