मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर हे आंदोलन हिंसक बनले होते आणि विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने आरोप केला जात होता की, त्यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आता जालन्यातील अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर. सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते? याची माहिती मागवली होती. त्यासाठी त्यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होआत. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर. सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे.
आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश आलेले नाहीत, असं त्यात म्हटलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी २३ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.
हे ही वाचा:
दोन वर्षांनंतर पुन्हा म्यानमार अस्वस्थ; भारताच्या गोटातही चिंतेचे वातावरण
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते असा विरोधकांनी प्रश्न केला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते.