दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट असे म्हणत. मात्र घाटकोपरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहलेले बॅनर लागलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या बॅनरची चर्चा रंगली आहे.
घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर चक्क हिंदुहृदयसम्राट लावण्यात आले आहे. मागेही एकदा असेच बॅनर ठाण्यात लागले होते, त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका म्हणून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले होते. आता राज ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अशातच आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यामुळे थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुहृदयसम्राट म्हटल्याने या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तसेच या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
भारताने घातली आणखी ५४ चिनी ऍप्सवर बंदी
मुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!
संजय राऊत यांच्या तोंडी ‘बरबाद’ करण्याची भाषा
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी महानगर पालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, आता राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या दौरे करताना दिसत आहेत. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक देखील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकांसाठी मनसेने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील ऍक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे.