हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री

दोन दिवसांच्या बैठकांनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी हिमांता बिस्वा सरमा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज झालेल्या भाजपा विधीमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हिमांता बिस्वा सरमा यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली. सरमा हे आज दुपारी ४ च्या सुमारास राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील, अशी माहिती मिळत आहे.

आज सकाळी ११ वाजता दिसपूर येथे भाजपाच्या विधीमंडळ दलाची बैठक पार पडली. या बैठकीला बीएल संतोष, बैजयंत जय पांडा आणि अजय जम्वाल आदी नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी हिमांता बिस्व सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव बैठकीत तात्काळ मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरमा यांच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालं आहे. सर्बानंद यांनी आधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, आज दुपारी हिमांता बिस्व सरमा हे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. येत्या दोन दिवसात सरमा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे ही वाचा:

पंढरपूर-मंगळवेढ्याचा निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार

लसीकरणावरून भारताला शिकवणीची गरज नाही- फ्रेंच राष्ट्राध्यक्ष

‘या’ कंपनीत मिळणार २८ हजार तरुणांना नोकऱ्या

चीनचे रॉकेट मालदीवजवळ कोसळले

सरमा यांची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने १५ मे २००१ पासून सुरू झाली. त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात प्रॅक्टिस केली आहे. १९९६ ते २००५ पर्यंत त्यांनी वकील म्हणून काम पाहिलं आहे. १ फेब्रुवारी १९६९ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कैलाशनाथ सरमा हे साहित्यिक होते. त्यांची आई आसाम साहित्य संस्थांशी संबंधित आहे. सरमा यांनी कामरुपमध्ये अकादमी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर गुवाहाटीतून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. विज्ञान विषयात त्यांनी पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं. राजकारणात असतानाच त्यांनी पीएचडीही केली.

Exit mobile version